Tuesday, January 2, 2018

ये हैं बॉंम्बे मेरी जान…


ये हैं बॉंम्बे मेरी जान…..
                                                                                 -अंजली अंबेकर

मुंबईचं माझं पहिलं वहिलं एनकाउंटर कुठलं?
            थोडं फ़ार आठवतं त्या वयापासून मुंबई माझ्या सोबतंच वावरत आहे.कधी दृश्य माध्यमांतील अबस्ट्रँक्ट पेंटिंग किंवा प्रतीकं/प्रतिमांच्या स्वरूपांत नजरेसमोर असायची,कधी अदृश्य माध्यमांतून  पार्श्वसंगीतातील अनवट वाद्याच्या नादासारखी कानांत मधूनच वाजायची,तर कधी कथा-कादंबऱ्यातील  एखाद्या अजोड पात्रांसारंखी मनांत सतत नांदायची अशा विविध माध्यमातून ती माझ्या नेणिवेत होती.तिची  जाणिवेतील पहिली आठवण म्हणजे माझी आजीने सांगितलेल्या एका घटनेची. माझी आजी स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबांसोबत काही वर्षं मुंबईत होती . सन १९४२ च्या चले जाव चळवळीच्या काळातलं मुंबईच्या आज़ाद हिंद मैदानावरील महात्मा गांधींचं भाषण तिने ऐकलं होतं आणि त्या बद्दल ती आम्हाला भारावून सांगायची.तिचं  ते सांगणं ऐकून मुंबई अशी भारावलेल्या अवस्थेत डोळ्यासमोर यायची ,ते ऐकूनच  मुंबई मला spiritual की काय अशीच वाटायला लागली होती.महात्मा गांधींच्या व्यक्तित्वाने  भारावून जाण्याची सुरुवात ही माझ्यासाठी मग मुंबईशीच संबंधित झाली .असा  सगळ्या मुंबई संदर्भातील जाणीवे -नेणिवेतील गोष्टीचा  कोलाज माझ्या मनांत प्रत्यक्ष भेटीआधीपासूनही नांदता होता .
        तरी पण या सगळ्या धूसर प्रतिमांच्या/visualise करण्यात आलेल्या  आठवणींपेक्षा मुंबईच्या आणि माझ्या एनकाउंटर ची स्पष्ट स्वरूपाची  आठवण ही या सर्वांपेक्षा वेगळीच आहे .
  सन १९८८ ला मीरा नायर चा “सलाम बॉम्बे “ हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा लगेच किंवा त्या नंतर कधीतरी मी तो मोठ्या पडद्यावर बघितला . त्या चित्रपटांत  शफीक सईद नावाचा बालकलावंत मुंबईतील अस्ताव्यस्त रस्त्यांवर धावतानाची काही दृश्यें दिसतात आणि ती दृश्यबद्ध करण्यासाठी अमेरिकन सिनेमेटोग्राफ़र सँडी सियोल चा कँमेरा मुंबईतील काटकोन त्रिकोणातील अणू रेणूंना दृश्यबद्ध करत पुढे पुढे सरसावत जातो.आणि त्याचा परिणाम अधिक गडद करणारा एल.सुब्रम्हण्यम यांचा अप्रतिम साऊंडट्रॅक मागे वाजत राहतो  . या सगळ्याचा टोटल इफ़ेक्ट म्हणजेच   पहिली ठळकपणे मनावर ठसलेली मुंबईची दृश्य पद्धतीची गडद आठवण.
          त्यानंतर कैक वर्षांनी   मुंबईत प्रत्यक्ष पहिलं पाऊल ठेवलं .त्यानंतर मात्र  अनेक प्रतिमा-प्रतीकांचे संदर्भ त्याला असूनही   मुंबईचं आणि माझं आजपर्यंतचं नातं सदा सर्वकाळ सुखनैव किंवा कलाभिमुख राहिलं आहे असं  नाही . त्यांत आता किती तरी अर्थाचे ,भावनेचे आणि वास्तवाच्या विविध रंगांचे पदर येऊन मिसळले आहेत. ते कधी सरळ पोताचे भासतात तर कधी अनंत गाठींचे झाले आहेत असं ही जाणवतं . 
                                त्याचं आकलन करून घेण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीलाच  मुक्कमल कराव्या लागणार आहेत ,त्यापैकी एक म्हणजे मुंबईबाबत या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्या प्रत्यक्ष भेटीत माझं झालेलं  मुंबईबाबतचं इम्प्रेशन . मी व्यावसायिक  कारणांनी  मुंबईत पहिल्यांदा आले.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  माझी वयाच्या बाविसाव्या वर्षी वित्त अधिकारी म्हणून निवड झाली होती आणि त्या संदर्भातील  दोन महिन्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी  मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवलं .औरंगाबादहून येणाऱ्या ट्रेनमधून मुंबईत  उतरले तेच  मुळी प्रचंड गर्दीच्या दादर स्टेशनवर आणि तेव्हा पहाटेचे साडे तीन वगैरे वाजले असावेत . दादर चा सुप्रसिदध  फूट ओव्हर ब्रिज  वरून चालताना ,त्यावर झोपलेल्या असंख्य माणसांमधून वाट काढत पुढे जात असताना काही अस्फुटसे आवाज आले म्हणून वळून बघितलं तर तिथे उघड्यावर रतिक्रीडा करणाऱ्या  एका स्त्री -पुरुषाची जोडी होती . क्षणभर काय चालले आहे ते  कळाले नाही . क्षणभराने भानावर आल्यावर ते  दृश्य बघून  मनाचा  थरकाप झाला .  मुंबई चा हा पहिला वाहिला शारीर अनुभव . त्याच मनःस्थितीत दादर स्टेशन च्या बाहेर पडलो तेव्हा राहण्यासाठी कन्फर्म असा कुठला आसरा नव्हता . सोबत एक मैत्रीण आणि तिची आई . त्या दोघीना मुंबई चा थोडासा अनुभव होता आणि त्यांनी वरळी चा शासकीय विश्राम गृहात आमची राहण्याची व्यवस्था केलेली . पण त्याचा नीटसा पत्ता त्यांना ठाऊक नव्हता आणि त्यांनी आमच्या  रूमचं आरक्षण ही कन्फर्म झाल्याची खात्री ही  केली नव्हती . त्या काकू सोबत आहेत म्हणून मी किंवा माझ्या घरच्यांनी ही फार खोलात जाऊन त्याची काळजी घेतली नव्हती . वयाच्या बाविसाव्या वर्षांतलं ते धाडस . त्या अनुभवाचा घेतलेला धसका म्हणा किंवा मनाचं वरचेवर कमी होत गेलेलं डेअरींग यापैकी काहीही . पण असं काही करण्याचं धाडस  मी पुन्हा केलं नाही . वरळी शासकीय निवासस्थानात आमचं आरक्षण झालंच नव्हतं. ज्या व्यक्तीला आरक्षणासंदर्भात फोन केला होता ,त्या व्यक्तीने ती गोष्ट व्यवस्थापनाला कळवलीच नव्हती . आणि नेमकी त्या दिवशी ती व्यक्ती ही  हजर नव्हती . या गोंधळात मात्र आम्ही अक्षरशः रस्त्यावर होतो . आम्ही विनंती केल्यावर त्या रात्रीपासून  आमच्या तिघींमधे तीन दिवसांसाठी  एक रूम द्यायला ते कसे बसे तयार झाले . दिवसभर ट्रेनिंग च्या ठिकाणी होतो पण  फ्रेश होण्याचा मुद्दा होताच . पैसे असले तरी सरसकट हॉटेल मध्ये रहायला जाण्याचं  चलन तेव्हा अस्तित्वातही नव्हतं .म्हणून तसे काही करण्याचा पर्याय  सुचला नाही एवढे खरे .   मग कसे बसे तिथल्याच सार्वजनिक  प्रसाधन गृहात तयार झालो आणि सामान दिवसभर सोबत घेऊन प्रशिक्षणाच्या ठिकाणी गेलो . सगळ्या प्रशिक्षणार्थी असताना ते सामान सोबत घेऊन फिरणं लाजिरवाणं  वाटत राहिलं . तेव्हा ठरवलं की आता आपण आपलीच राहण्याची व्यवस्था मुंबईत तरी करायला हवी . कुणावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही . त्या घटनेने माझी त्याबाबतीतली  भूमिका कायमची ठरली गेली.  त्यामुळे मुळात असलेली स्वतंत्र वृत्ती अधिकाधिक स्वतंत्र होत गेली . मुंबईत पहिलं पाऊल टाकल्याक्षणी मिळालेला मोठा धडाच होता तो .
                 तीन दिवसाच्या वरळी शासकीय विश्रामगृहातील अनुभवानंतर मी अजून दुसऱ्या एका मैत्रिणी सोबत बांद्रा पूर्व येथील कार्डिनल स्कुल च्या बाजूला असणाऱ्या श्रम साधना या वर्किंग विमेन हॉस्टेल ला पुढच्या कालावधीसाठी राहिलो . सोळा ते पंचावन्न अशा वयोगटातील महिला त्या हॉस्टेल मध्ये रहायच्या .
विविध स्तरातील मुंबईत काम करणाऱ्या सिंगल विमेन साठीचं ते हॉस्टेल होतं . योगायोगाने माझं एक दूरचं नातेवाईक कुटुंब हॉस्टेल पासून हाकेच्या अंतरावर राहत होतं . त्यामुळे अधून मधून त्यांच्याकडे जाण व्हायचं.  त्यांच्या मुली माझ्याच वयाच्या होत्या . मुंबईच्या  सांस्कृतिक पार्श्वभूमीचं  सर्वाधिक मला  आकर्षण होतं. म्हणून मी काकांकडून आणि त्यांच्या मुलींकडून शिवाजी मंदिर ,रिदम हाऊस ,एन . सी . पी .ए किंवा जहांगीर आर्ट गॅलरी अशा ठिकाणांचे पत्ते तिथे जायचं कसं हे विचारून ,ते डायरीत लिहून घ्यायचे . मोबाईलचं युग अजून अवतरलेलं नव्हतं .म्हणून डायरीची महत्वाची सोबत असायची आणि ट्रेनिंग संपलं की शासकीय गदारोळात न अडकता  माझी मग  मुंबईतील भटकंती सुरु व्हायची .त्या दोन महिन्यातील साठ दिवसांच्या  कालावधीत मी १५-१७ मराठी ,दोन हिंदी नाटकं बघितली  आणि एक शास्त्रीय संगीताची मैफल ऐकली होती. ती बहुधा बेगम परवीन सुलताना यांची होती .  असंख्य पुस्तकं आणि सीडीज खरीदल्या होत्या .प्लॅनेट एम तेव्हा टाईम्स बिल्डिंग मध्ये नुकतंच सुरु झालं होतं आणि सीएसटी स्टेशन समोरचं मॅकडोनाल्ड ही त्याच काळातलं .मला मात्र शेवटपर्यंत ऱ्हिदम हाऊस हेच संगीतातील तीर्थ स्थानासारखं वाटत राहिलं . तीच गोष्ट स्ट्रॅन्ड बद्दल ही म्हणायला हवी . हुतात्मा चौकातील रस्त्यावरील पुस्तकांच्या दुकानातून किती तरी पुस्तकं घेतली आणि ती किती तरी वर्षं मला पुरली .  ऱ्हिदम हाऊस मधून आणलेल्या  वीणा सहस्र्बुद्धे ,कुमार गंधर्व, मालिनीताई राजूरकरांचं संगीत अजून ही पुरतंय . सोबतच मुंबई शहरातील  गर्दीचा,प्रवासाचा  सकाळी बाहेर निघाल्यापासूनच अव्यक्त ताण मनावर सतत असायचा  आणि तो दिवसभर जाणवायचा . एवढी वर्षं झाली तरी त्यात अजून बदल नाही .

                          एकदा प्रशिक्षण काळात माझे वडील मला मुंबईत एकदा भेटायला आले होते . मग माझी ओळख करून देण्यासाठी ते मला मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या काकांकडे घेऊन गेले . ते काका राहायचे अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये . आम्ही ट्रेन ने बांद्रा ते अंधेरी असा प्रवास गर्दीच्या वेळी केला आणि अंधेरी स्टेशनवर पोचलो. अंधेरी स्टेशनवर ची ती भयावह गर्दी आणि  त्यातून ही तासाभराच्या झटापटीनंतर ऑटो मिळाला. या सगळ्याचा सामना करून आम्ही काकांकडे पोचलो . काही वेळ आम्ही त्यांच्याकडे होतो ,त्याच दिवशी माझे पिरिअड्स संपत आले होते.त्यांच्या घरून निघताना  मी वॉश रूम ला जाऊन आले  आणि या सगळ्या ताणामुळे की अजून  कशामुळे माहित नाही  पण मी माझे सॅनिटरी पॅड त्यांच्या वॉश रूम मध्ये विसरले आणि तसेच आम्ही तिथून निघालो . रात्री परत येताना ट्रेन मध्ये मला ते आठवलं आणि जाम टेन्शन आलं . बांद्रा स्टेशनवर उतरल्यावर पब्लिक बूथ वरून त्या काकूंना फोन केला आणि सॉरी म्हणाले . त्या ते ऐकून होतं गं असं कधी कधी म्हणाल्या पण वरनं  तुम्ही गावाहून आलेल्या मुलींना अशा सवयी नसतात ना ,मुंबईतील मुली या बाबतीत पर्टिक्युलर असतात वगैरे ऐकवलंच . या घटनेला वीस वर्षाहून अधिक काळ झाला आहे . दरम्यान मी ही मुंबईच्या गर्दीचा भाग झालेच .त्या काकूंची आणि माझी पुन्हा कधी भेट ही झाली नाही . तशी ही माझी जनरलाईज मेमरी चांगली नाहीच .पण मला ही घटना अद्याप  विसरता आलेली नाही .त्यानंतर  मी ही अनेकदा मुंबईतील पब्लिक टॉयलेट्स वापरते ,म्हणजे त्याला काही पर्याय ही नसतो . ती पब्लिक टॉयलेट्स  वापरणाऱ्या बहुसंख्य महिला ही मुंबईच्याच असतात. तिथे अनेकदा इतस्ततः सॅनिटरी पॅड्स पडलेली असतात सार्वजनिक ठिकाणच्या डस्टबिन्स मधील कचरा जिथे तिथे ओथंबून वाहत असतो आणि त्यातून   प्रामुख्याने व्यवस्थित पॅक न केलेले पॅड्स डोकावत असतात . तेव्हा मला आवर्जून त्या वेगळ्याच मुंबईत राहणाऱ्या काकूंची आठवण येते.मुंबईत राहणाऱ्या लोकांचा दांभिक दर्प अजूनही जाणवत राहतोच .
                                         माझं  मुंबईतील प्रशिक्षण संपल्यावर परभणीत पोस्टिंग झालं आणि मी तिथे रुजू झाले . तिथे मी प्राथमिक शिक्षणाच्या प्रकल्पावर काही वर्षं काम केलं . त्याचं मुख्य कार्यालय मुंबईत होतं.  त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मुंबईत बैठकांच्या/वर्कशॉप च्या  निमित्ताने येणं व्हायचं आणि अशा पद्धतीने मी पुन्हा मुंबईशी जुळल्या गेले .या वेळची मुंबई माझ्यासाठी अधिक निकाली ढाकळी होती . दीर्घ काळ वास्तव्याचं भूत मानगुटीवर बसलेलं नव्हतं आणि एक-दोन दिवसासाठीची ती मजाच असायची .  मुंबईतील बैठका अनेकदा शुक्रवारी असायच्या . तेव्हा बैठक झाली की मी अनेकदा अंधेरीत माझे मित्र श्यामल -मंगेश या माझ्या मित्रांकडे जायचे . मग आमची एकत्रित  मुंबई स्वान्तसुखाय केलेली  भटकंती ,सांस्कृतिक उपक्रमांना भेटी असे कार्यक्रम व्हायचे . दोन दिवसांच्या धावपळीतही अशोक जैन सरांना त्यांच्या घरी भेटायला जाणं  व्हायचं . मग त्यांच्याशी झालेल्या चर्चेतूनही माझ्या मुंबई एक्सप्लोर  करण्याच्या उपक्रमाला वेगळं परिमाण लाभायचं.  अशाच भेटींमधून माझा प्रभात चित्र मंडळाशी संपर्क झाला आणि मी जागतिक चित्रपट अधिक जाणतेपणाने बघायला लागले . मग त्या नंतर ची तीन -चार वर्षं मी नेमाने पंढरीच्या वारी सारखे थर्ड आय (आशियाई चित्रपट महोत्सव ) आणि मामि (मुंबई मुविंग इमेजेस) )यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा जागतिक चित्रपट महोत्सव नेमाने सुटी टाकून बघायला लागले आणि त्यासाठी माझी मुंबईची वारी ही ठरलेलीच होती . या सांस्कृतिक उपक्रमांसोबत मुंबई ची ही एक शहर म्हणून ,एक कॅरेक्टर म्हणून ओळख होत होतीच . त्यातला भौगोलिक ,सामाजिक आणि आर्थिक संदर्भासोबतच प्रत्येकाचा वैयक्तिक असा संदर्भ त्याला चिकटून आहे ,हे ही हळूहळू लक्षात येत गेलं . मी मुंबई सोडून परभणी ,पुणे आणि औरंगाबाद या शहरातही दीर्घकाळ वास्तव्य केलेलं आहे . परंतु मुंबईचं जसं समूहातलं बहुतांश जगणं असूनही प्रत्येक माणसासोबतचं एक असं स्वयंभू नातं जुळतं तसं इतर शहरांचं  झालेलं दिसत नाही . मुंबईतील प्रत्येकांनाही सतत समूहाचा भाग असल्यामुळे कदाचित त्यातूनही स्वतःची स्पेस शोधण्याचं कसब साधलंय त्यातंच मुंबईच्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या नात्याचं मूळ धरून असलं पाहिजे . म्हणून प्रत्यक्षात मुंबईत येण्यापूर्वी  ही माझं जे मुंबईशी नातं तयार झालं त्यात अशा पद्धतीने साहित्यातून, चित्रपटातून व्यक्त झालेल्या अनेकांच्या अभिव्यक्तीचाही  मोठा सहभाग होता . विक्रम चंद्राचं Love and longing in Mumbai किरण नगरकरांच्या आणि भाऊ पाध्येंच्या लिखाणातून अव्याहत वाहणारी मुंबई ,गंगाधर गाडगीळांचं “प्रारंभ”
जयवंत दळवींच्या लिखाणातून डोकावणारी खानावळी संस्कृतीची मुंबई ,श्री.दा.पानवलकरांच्या कथांमधून दिसणारी कडेकपारीतील मुंबई,मेघना पेठेंच्या कथांमधून बाहेर येणारी गर्दीतील अकेली मुंबई ,के.ए . अब्बास यांचा “बम्बई “हा लेख आणि त्यातून भटकत जाणारी पत्रकारीतेतील  मुंबई . लाईफ इन मेट्रो ,स्लमडॉग मिलिऑनर ,धोबी घाट ,लंच बॉक्स इ. अशा असंख्य चित्रपटातून जाणवत गेलेली मुंबई . अशा एक ना अनेक मुंबईच्या इमेजेस मनांत वावरत होत्या . सुरुवातीच्या काळात या मनातल्या इमेजेस मी शोधत असायचे ,पण असं करता करता माझ्या स्वतःच्या इमेजेस तयार होत गेल्या आणि त्यांत मी इतरांचे रंग न शोधात स्वतःचे रंग मिसळायला लागले आणि माझं मुंबईचं चित्र नव्याने आकार घ्यायला लागलं .


 .
                   काही वर्षांनी माझी परभणीहुन औरंगाबाद ला बदली झाली. या पोस्टींग मध्ये मात्र मुंबईत यायचं ऑफिशिअल काही कारण नव्हतं.  औरंगाबाद ला माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं होतं,तेव्हा मी बरीच वर्षं औरंगाबाद ला होते त्यामुळे तसा माझा  औरंगाबाद ला जुना गोतावळा होताच . फक्त तो या पोस्टिंगच्या निमित्ताने मधल्या काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा नव्याने वेगळ्या परिवेशात भेटला.औरंगाबाद ला  आमची सांस्कृतिक घोडदौड जोरात चालू होती . आम्ही औरंगाबाद मधला पहिला पुलोत्सव घेतला ,दृष्टांत फिल्म सोसायटी ची स्थापना केली असं बरंच काही सांस्कृतिक आम्ही करत होतो . मी माझं स्वतःचं असं घर ही घेतलं आणि मी खरंच मध्यमवर्गीय परिभाषेतील शेटल झाले . :-) . औरंगाबाद हे शहर माझ्यासाठी कायम कोझी असं राहिलं आहे . तिथल्या सगळ्या गोष्टी आवाक्यातील वाटतात . मुंबईत तो कोझीनेस नाही . तुमच्या नजरेच्या किंवा श्वासाच्या टप्प्यात इथे काहीच नाही . औरंगाबादच्या mindful असण्याच्या काळात  माझ्या मुंबईच्या फेऱ्या मात्र कमी झाल्या  होत्या .मी मुंबई पासून काही काळ दुरावलेच . परंतु त्यानंतर कधी तरी सतीशची (नवरा )  आणि माझी ओळख झाली ,आम्ही  एकमेकांना भेटत होतो .तो मुंबईचा आणि टेलीग्राफ या वृत्तपत्रांत काम करत होता. मग मुंबईचं आणि माझं नातं ब्रेक नंतर पुन्हा जुळलं . सतीशमुळे मुंबई बघण्याला आणि अनुभवण्याला आगळं परिमाण लाभलं . त्याचं मुंबईतलं विश्व ,मी आत्तापर्यंत फिरत होते त्या मुंबई पेक्षा वेगळंच . मी अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी मुंबईत पटकन टॅक्सी करायचा माझा धीर व्हायचा नाही . त्याच्यासोबत मात्र मी टॅक्सीवाली मुंबई अनुभवत होते . सतीश आणि मुंबई  माझ्यासाठी समानार्थीच होते . सतीश शी लग्न करण्याचा निर्णय म्हणजे मी औरंगाबाद सोडून मुंबईत शिफ्ट होणं याचा निर्णय घेणं होतं आणि अर्थात ते माझ्यासाठी सोपं नव्हतंच .औरंगाबाद मुळे आलेली सेटलमेंट ची भावना मला खूप महत्वाची वाटत होती . इतक्या वर्षाच्या धावपळीनंतर मिळालेलं मनःस्वास्थ्य मला घालवायचं नव्हतं. पण शेवटी  माझी  शासकीय नोकरी असल्यामुळे मला इथे बदली करून घेणं शक्य होतं आणि सतीश इंग्रजी पत्रकारितेतील असल्यामुळे त्याला औरंगाबादला येणं व्यावसायिक दृष्ट्या शक्य नव्हतं हा व्यवहार्य भाग निर्णय घेताना शेवटी महत्वाचा झाला . तो मुंबईचा असूनही संयुक्त कुटुंबात राहायचा आणि मी औरंगाबाद सारख्या छोट्या शहरातही स्वतंत्र राहायचे. मी रूढ अर्थाने एकटी राहायला लागून ही तेव्हा सात वर्षाहून अधिक काळ झाला होता . एकटेपणाचे मला व्यसनच जडले होते , दिवसभर माणसांच्या गोतावळ्यात राहून संध्याकाळचा तो एकांत मला हवाहवासा वाटायचा . माझी पुस्तकं ,सीडीज ,फिल्म्स माझी आवर्जून वाट बघायचे . इथे तर  मुंबई सारख्या भयावह गर्दीच्या ठिकाणी राहायचा  तर मी औरंगाबाद सारख्या तुलनेत कमी गर्दीच्या शहरांत राहायचे . म्हणून आम्हाला लग्नाचा निर्णय घ्यायला इतर कारणांसोबत मुंबई या कारणामुळे ही विलंब झाला. आम्ही लग्न केल्यावरही सहा महिने मी औरंगाबादलाच होते ,त्यानंतर माझी ठाण्यात बदली झाली. ठाणे हे शहर हे मुंबईचाच कांदिवली किंवा मुलुंड सारखा भाग आहे . प्रशासकीय दृष्ट्या त्याचं वेगळं अस्तित्व असलं तरी त्याला मुंबईपासून वेगळं असं अस्तित्व नाही .  म्हणून आमचं घर जरी ठाण्यात असलं तरी आम्ही फक्त काही वेळेसाठीची सोय म्हणून ठाण्याकडे बघणार होतो याची पूर्ण कल्पना आम्हाला होती . सुरुवातीची दोन-तीन वर्षं घरापासून ठाण्यातलं ऑफिस जवळ असल्यामुळे प्रवासाचा त्रास नव्हता आणि माझा मुलगा तेव्हा तान्हा असल्यामुळे ते सोयीचं झालं . तीन वर्षांनी माझी बदली थेट नरिमन पॉईंट च्या ऑफिस मध्ये झाली आणि रोजचं माझं मुंबईचं अफेयर तेव्हा  खऱ्या अर्थाने सुरु झालं. 


                                          पहिला भाग अर्थातच लोकल ट्रेनचा प्रवास  . गेली आठ -दहा वर्षे मी ट्रेन ने ऑन /ऑफ असा प्रवास करायचे परंतु  त्यात ठराविक वेळेचा प्रवास असं काही टार्गेट नसायचं . त्यामुळे ती प्रवासाची  दाहक वास्तविकता  माझ्यावर कोसळली नव्हती . आता रोज ऑफिस ला ठराविक रश अवर्स मध्ये जाणं भाग होतं  आणि  त्याचा खूप ताण ही यायचा मनांवर . मला आठवतं ,सुरुवातीच्या काळात आमच्या सोसायटीच्या या प्रवासासाठी सराईत असणाऱ्या मैत्रिणींसोबत बऱ्याचदा मी प्रवास करायला लागले होते . एकदा कल्याण फास्ट पकडल्यावर त्या मैत्रिणी दिसल्या म्हणून मी फक्त माझ्या हातातील बॅग बाजूच्या सीट वर ठेवली. तिची जागा पकडावी असं ही एकदम डोक्यात आलं नाही किंवा लोकल संस्कृती मध्ये हे चालत नाही हे काही मला ठाऊक ही नव्हतं . त्यांना हे अर्थात माहीत होतंच.  म्हणून त्या जागेवर त्या  बसल्या नाहीत परंतु या एका गोष्टीवरून बायकांनी एकदम कल्ला सुरु केला. अर्वाच्च्य शिव्या आणि प्रकरण माझ्या शिक्षणापर्यंत आणि आई - वडिलांपर्यंत पोचलं . मी काही स्पष्टीकरण देणार तितक्यात मैत्रिणीने पटकन गप्प बसण्याची खूण केली . पण पुढचा चाळीस -पन्नास मिनिटांचा प्रवास humilation या शब्दाचा काय अर्थ असतो हे आयुष्यात पहिल्यांदा मला कळालं . काही कारण नसताना मला ते सहन करावं लागलं . कल्याण फास्ट मधला वेग माझ्यापुरता कमी झाल्यासारखा वाटला . त्या ट्रेन मधला एकेक क्षण युगासारखा भासत होता .  दोन स्टेशन्स मधला निश्चित वेळ अकारण वाढलेला वाटत होता . ठाण्यात पोचल्यावर एकाच ऑटो मध्ये आम्ही मैत्रिणी बसलो होतो पण एकमेकींशी एक  शब्द ही न बोलता घरापर्यंत पोचलो .  या प्रसंगानंतर  किती तरी दिवस मी त्या मैत्रिणींना  टाळायचे. मुद्दाम नेहमीची ट्रेन सोडून प्रवास करायचे . या सगळ्यांत माझा काहीच दोष नव्हता पण शरमेने मी बराच काळ थिजून गेले होते . 
                                          त्यानंतर  वर्षंभर मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स च्या ऑफिस मध्ये पोस्टिंग ला  होते . प्रवासाच्या दृष्टीने ते तसं कमी ताणाचं होतं . एसी बसेस ने मी तो प्रवास करायचे ,ट्रॅफिक  मध्ये बराच वेळ जायचा   हे कारण सोडलं  तर एकुणात  मुंबईच्या इतर प्रवासाच्या मानाने ते  फारंच सुखावह होतं . त्यानंतर प्रवासाच्या धबडग्यांत स्वत:ला झोकून दिलंच.त्याबाबतची कुरकुर कमी होत होत गेली . ती पूर्णपणे थांबली किंवा थांबेल  असं नाही . मुंबई हा विषयच लोकल ट्रेन च्या प्रवासाशिवाय सुरु होऊ शकत नाही आणि संपू ही शकत नाही . पन्नास -पन्नास वर्षं प्रवास करून ही त्या विषयी अटीतटीने चर्चा करणार्यांचं मात्र अजूनही कौतुक वाटतं.तीनच वर्षांत मी नरिमन पॉईंट ,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स करून पुन्हा प्रभादेवी इथे पोचले.  पहिलं पाऊल जिथे ठेवलं त्या दादर स्टेशनातूनच  आज मी रोज प्रवास करते . थोड्याशाही नैसर्गिक बदलांचा ताण सहन न होणारं हे शहर पाहिलं  की हटकून औरंगाबाद ची आठवण येते . नवीन जेव्हा माझा ट्रेन चा प्रवास सुरु झाला तेव्हा एक दिवस ट्रेन च्या अलोट गर्दीत स्फुंदून स्फुंदून एकटीच रडणारी मुलगी बघितली . ते पाहून कुणी ही तिला काही विचारलं नाही . ते पाहून मी फार अस्वस्थ झाले होते . दिवसभर त्या मुलीचा विषयच डोक्यात होता . अशा अनेक प्रसंगी माझ्या जुन्या जाणत्या कनवाळू  शहराची ,गावाची आठवण यायची.माझ्या शहरांत तर सतत सहृदयता नांदती होती असं उगीचच वाटून जायचं . मन मग  मुंबईला कोसायचं आणि मुंबईचा द्वेष द्वेष करायचं .

     शहरातील सरत्या दिवसांसोबत माझी मी ही बदलत जातेय . अजून ही दोन तीन दिवसांनी सकाळच्या वेळी डोळ्यात पाणी येणारी एकाकी पडत गेलेली कुणी तरी प्रवासात भेटतेच.  तिला बघून , मी दोन क्षण अस्वस्थ होते आणि ती अस्वस्थता  प्रवास संपल्यावर विरून ही जाते. मुंबईतील सराईतासारखं मी ही माझं आयुष्य जगायला पुढे निघून जाते .

               कधी तरी आभाळ भरून आलेल्या संध्याकाळी miss you असा धावत्या ट्रेन मधून कळवळून कुणाला तरी मेसेज करावासा वाटतो . मुंबईतील माझे सुहृद त्या त्या वेळी प्रवासांत असतील असं मनांत येऊन त्यांच्याशी होऊ घातलेला संवाद मनातच खुंटतो . अवाढव्य पसरलेल्या शहरांत माझ्या बिंदू एवढ्या अस्तित्वाची जाणीव तशीच आतल्या आत विरघळून जाते आणि मी मग लगेच दुसऱ्या क्षणांत उडी घेते . 
                                 प्रत्येकवेळी आर्थिक गणितच असतात असं नाही .  पण मुंबईत माणसं एकमेकांच्या निर्हेतुक असे फार काळ  संपर्कात राहत नाहीत .त्याचं फार कुणाला गम्य वाटतं असं ही दिसून येत नाही . किती तरी माणसं अशीच माझ्या आठ वर्षांत आयुष्यात आली आणि पावलांचे ठसे ही न उमटवता ही निघून गेली आहेत . वर्तमानातील क्षणाचं उपयुक्तता मूल्य जोखून दुसऱ्या क्षणांत पोचण्याची अपरिहार्यता त्यामागे असावी.नक्की सांगणं कठीण आहे . अशा वेळी मुंबई माझ्यासाठी  एकदम परकी परकी होऊन जाते .           
           कधी तरी मुंबईच्या फोर्ट भागांत आम्ही चार -पाच मैत्रिणी ड्रिंक साठी एखादी संध्याकाळ गाठतो . फोर्ट परिसरातील सात नंतरची संध्याकाळ आपल्याभोवती  शांत पहुडलेली दिसते  . ती अनुभवण्यासाठी  कधी तरी सहा महिन्यातून एकदा ती संध्याकाळ  गाठवीशी वाटतेच . समोर असणारा बडवाईजर चा  फेसाळता ग्लास आमच्या मनातला कल्लोळ त्याच्या गोल्डन ब्राउन रंगाच्या द्रवामध्ये शोषून घेतो .तिथून आम्ही एका वेगळ्याच तंद्रीत त्यानंतर  सीएसटी स्टेशनवर येतो आणि त्या पुढच्या  घरापर्यंतच्या  थकवणाऱ्या प्रवासाचं
काहीच वाटत नाही.
            
      अनेक तल्लिनतेचे क्षण मुंबईतील एन.सी.पी.ए. ,नेहरू सेंटर आणि षण्मुखानंद मधल्या मैफली ऐकताना ही मिळत असतात . ऱ्हिदम हाऊस आणि सामोवार चं कालौघात नाहीसं होणं वेदनादायी होतं . ती मला माझ्या एखाद्या जवळच्या सुहृदासारखीच होती . मुंबईत येऊन मी अशा सांस्कृतिक उचापत्या बऱ्याच करायला शिकले . संजना कपूर चे जुनून उपक्रम ,पृथ्वी चे थिएटर फेस्टिवल्स ,बॅनियन ट्री /पंचम निषाद च्या मैफली थर्ड आय /मामि चित्रपट महोत्सव इ उपक्रमांना मी पंढरीच्या वारीसारखी नियमित हजेरी लावणं हे सगळं माझ्या रुटीन चा भाग झाला आहे .  लोकल च्या /रस्त्यावरच्या भयावह गर्दीत षण्मुखानंद मध्ये नुकतीच ऐकलेली मैफल कानाशी येते आणि गर्दीचा ,घामाने भिजलेल्या शरीराचा श्वासोश्वासाच्या भाऊगर्दीचा क्षणभर विसर पडतो .मग लक्षात येतं की दिवसा  उजेडीच्या आणि गडद रात्र अंधाराच्या कुठल्याही प्रहरांत जसा  राग छायानट आपल्यात भिनत जातो तशी  मुंबई माझ्यात हळूहळू भिनत जातेय .

                             अवचित एखादी संध्याकाळ  चुकारपणे अशीही  येते ,पुन्हा औरंगाबाद ,परभणी आणि गंगाखेड च्या वाटांकडे डोळे लागतात आणि थोडं वळून बघितलं की लक्षात येतं की वाटा पुसट झाल्या आहेत.  आता परतीचा लख्ख रस्ता इतक्यात तरी  मिळणार नाही आणि मी थांबते .
   Youtube वर ऐकलेलं नॅन्सी गिफिथ या अमेरिकन गीतकाराचं नुकतंच ऐकलेल्या Rita Mcneil  यांच्या you can,t go home again या गाण्यातील ओळी आठवतात. .


                  
You can't go home again
You can't go home again
And trying to hold yesterday
Is like arms around the wind            
               घरी गौरी देशपांडेच्या अनेक कथा कादंबऱ्यांत रेखाटलं गेलं आहे  असं  नवऱ्यासारखं   कुठल्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहू शकणारं पाञ असतं ,झऱ्यासारखं खळाळतं मूल असतं आणि सोबत असंख्य मित्र मैत्रिणी  या  शहरांत विखुरलेले    असतात . असं सगळं असताना ही माझं आणि मुंबईचं नातं मात्र  वरचेवर  स्वयंभू ,स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशी होत असल्याची जाणीव होत आहे  .
              मृणाल सेन यांनी, त्यांच्या “Always being born “या आत्मचरित्रांत कोलकाता शहराविषयी जे लिहिलेय ,तेच मला मुंबई बाबत आलटून पालटून किंवा सतत म्हणावंसं वाटतं,
Mercilessely maligned ,dangerously loved city .

                                                                                       




मी वाट बघते आहे …. -कौशिकी चक्रवर्ती

                                                    मी वाट बघते आहे ….
                                                  -कौशिकी  चक्रवर्ती
मला माझं संगीतासोबतचं नातं नेमक्या शब्दांत अधोरेखित करता येणार नाही ,कारण तसा नेमक्या शब्दांत स्पष्ट होण्यासारखा कार्यकारण भाव त्यामागे नाही .मला जसं आठवतं तसं संगीत माझ्या सतत अवतीभवती आहे . त्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या घराचा श्वासंच संगीत आहे ,अशा घरात मी जन्म घेतला . मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की ,संगीताशिवाय कुठल्या क्षेत्रांत मला करिअर करायला मला आवडलं असतं ,याचं खरंच काही उत्तर माझ्याकडे नाहीय.कारण तसा प्रश्न मी स्वतःला कधी विचारला नाही . आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच असेल तर मी एवढंच म्हणेन की ,संगीत नाही तर मीच नाही ,एवढं संगीताने माझं अस्तित्व व्यापलं आहे . संगीताशिवाय जगण्याचा कुठला मार्ग ही मी अवलंबिला नाही किंबहुना तो मला माहीत ही नव्हता आणि म्हणून इतर कुठल्या वाटेने मी जाण्याचा कधी प्रयत्न ही केला नाही .मी दोन अडीच वर्षांपासून संगीताचं शिक्षण घेतेय ,तुम्हा सगळ्यांसारखीच माझी ही आई हीच माझी पहिली गुरु . माझी आई चंदना चक्रवर्ती ही पतियाला घराण्याचीच.तिने विदुषी मीरा बॅनर्जी , बडे खां साहेबांच्या शिष्या यांच्या कडे स्वत: संगीताचं शिक्षण घेतलं होतं. आई नेच मला संगीताचे पहिले धडे दिले.  माझे बाबा पंडित अजय चक्रवर्ती हे त्या काळांत स्वत:च संगीत क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपड करत होते, या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा संघर्ष सुरु होता .आज संगीताच्या क्षेत्रांत जे चक्रवर्ती घराण्याचं नाव आहे आणि ते आहे बाबांमुळे,त्यांनी ते अविरत कष्ट करून यश मिळवलं आहे .  त्यांच्या व्यस्ततेमुळे  त्यांना माझ्या सुरूवातीच्या शिकण्याच्या काळात मला संगीत शिकवता आलं नाही . पण बाबांनी मला वयाच्या सातव्या वर्षांपासून मात्र घरीच शिकवायला सुरुवात केली.  बाबा गुरु म्हणून खूपंच कडक होते आणि अजूनही आहेत . संगीत हा त्यांच्यासाठी कायम प्राधान्याचा विषय राहिला आहे . तो माझ्यासाठी ही असावा असाच त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला . याच विचारातून त्यांनी मला  त्यांचे   गुरु पंडित ज्ञानप्रकाशजींकडे संगीताचं शिक्षण  घेण्यासाठी पाठवलं  ,तेव्हा मी वयाने फारंच लहान होते. पुढचे काही दिवस मी त्यांच्याकडे शिकले परंतु वृद्धापकाळामुळे पंडित ज्ञानप्रकाशजीची प्रकृती खालावत गेली आणि चारेक वर्षानंतर माझं त्यांच्याकडे जाणं थांबलं . गुरूजी हे बाबांचे ही गुरू म्हणून बाबा आमच्या दोघांमधला पूल राहिले.मग मी कोलकत्याच्या ITC Sangeet Research Academy मध्ये संगीताचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला ,बाबा ही तिथेच शिकले होते आणि तिथेच अजूनही शिकवतात .  ITC Sangeet Research Academy ला संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उज्ज्वल परंपरा आहे ,स्वत: सत्यजित रे ,पंडित ज्ञानप्रकाशजी घोष ,गिरीजा देवी ,माझे बाबा पंडित अजय चक्रवर्ती , उस्ताद राशीद खान ,पंडित उल्हास कशाळकर ,पंडित बुद्धदेव दासगुप्ता ,उदय भवाळकर असे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याच्याशी जोडल्या गेले आहेत . निस्सार हुसेन खां साहेब ,निवृत्तीबुवा सरनाईक ,श्रुती सडोलीकरजी ,गिरिजादेवीजीं ही सगळी संगीतातील दिग्गज मंडळी तिथे होती ,त्यांच्यापैकी काहींना   मी मुलीसारखी आहे तर काहींना मी नातीसारखी आहे . ते सगळे मला कुटुंबातील सदस्यांसारखेच वाटतात . तिथेच मी माझी संगीतातील पदवी प्राप्त केली .
                          मी यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या घरांत अवती भवती सतत संगीत असल्यामुळे ,घरांत सतत संगीत क्षेत्रातील संबंधित लोकांचा राबता राहिला आहे . उस्ताद झाकीर हुसेन किंवा उस्ताद राशिद खान हे संगीत क्षेत्रातील उस्ताद आहेत अशी ओळख पटण्या अगोदर ते माझे झाकीर चाचा आणि राशीद काकू म्हणून मला परिचयाचे होते .बाबा आणि राशीद काकूंचं तर असं नातं आहे की ,बाबा स्वतःसाठी जेव्हा चपलांचे जोड घेतात तेव्हा त्यांच्यापेक्षा एक नंबर छोटा जोड ते राशीद काकूंसाठी घेतात . तसेच संध्याकाळी  राशीद काकू  घरी यायचे ,ते शामी कबाब बनवायचे  ,ते सगळं रात्री दीड -दोन पर्यंत चालायचं . त्यांना खाण्याचा आणि खिलवण्याचाही खूप शौक आहे . मी अनेकदा बाबांसोबत  त्यांच्या घरी जाऊन या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. .अजूनही राशिद काकू मला स्वतःच्या मुलीसारखंच मानतात . ते संगीतातील उस्ताद वगैरे आहेत त्याबद्दल आदर आहेच ,पण त्यापेक्षा अधिक ते राशीद काकू म्हणून मला जवळचे आहेत , तर आमची  एकमेकांच्या कुटुंबं  एकमेकांच्या भावनेने जवळ आहेत . ते अधिक सुंदर नातं आहे असं मला वाटतं.  राशीद काकूंची गायनाची शैली मला प्रचंड आवडते .त्याचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे.म्हणून एकदा मी गाण्याच्या कार्यक्रमात राशीद काकूंची  राग देश मधील एक  बंदीश एका मैफलीत त्यांच्यासारखीच गायचा प्रयत्न केला परंतु अंतऱ्यातील शेवटची लाईन मला तितकीशी जमली नाही . मग ते दुसऱ्या दिवशी मी राशीद काकूंना फोन करून सांगितलं आणि कबुल ही केलं की मी तुमची बंदिश चोरून गायचा प्रयत्न केला पण मला ती तितकीशी जमली नाही मग त्यांनी हसून ती कशी तंत्रशुद्ध पद्धतीने गायची याचं प्रात्यक्षिक फोन वर गाऊन दाखवलं आणि ती पूर्ण बंदिशच त्यांनी  मला फोन वर शिकवली . आमची ती संगीत मैफल किती तरी वेळ फोन वरच रंगली होती . तेच मला उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल ही म्हणावसं वाटतं . माझ्याकडे आमच्या दोघांचा असा एक जुना फोटो आहे ,त्यांत झाकीर चाचूने मला त्यांच्या कडेवर घेतलं आहे ,त्यावेळी माझं वय होतं अवघं तीन . त्यानंतर मी तिशीची असताना नेहरू सेंटर मधील माझी मैफल ऐकायला झाकीर चाचू प्रेमाने साधा शर्ट पायजमा घालून आले आणि माझ्यापुरतं आमच्या स्नेहाचं एक वर्तुळ पूर्ण झालं . हा सगळा माझा प्रवास मलाच विस्मयचकित करतो . या पेक्षा वेगळं स्वप्न ते काय असं वाटणारं एक  स्वप्नवत आयुष्य मी जगतेय . आणि या पेक्षा अधिक काही मी आयुष्याकडून अपेक्षाच करु शकत नाही इतकं काही मिळालंय .
       संगीताची पदवी प्राप्त करण्यासोबतच मी जेव्हा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पदव्युत्तर शिक्षण कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला बाबांची  त्यासाठी समंती नव्हती . मी तत्वज्ञानात शिक्षण पूर्ण करू नये अशी त्यांची भूमिका मुळीच नव्हती परंतु मी ते पूर्णवेळ न करता अर्धवेळ किंवा दूरस्थ शिक्षणपद्धतीने पूर्ण करावं असं  त्यांचं मत होतं . त्यामागे ही त्यांची अशी भूमिका होती ,की त्यामुळे माझं संगीतावरचं concentration कमी होईल . कारण  यापूर्वीच मी सांगितल्याप्रमाणे, संगीत हा त्यांच्यासाठी  प्राधान्यक्रमाचा विषय राहिला आहे .मी आणि संगीत यांत कुणीच यायला नको,अशा आशयाचा त्यांचा विरोध होता. मा आणि बाबा या दोघांनी ही त्यांचं पदव्यूत्तर शिक्षण रविंद्र भारती विद्यापीठातून संगीतातंच पूर्ण केलं आहे.,परंतु मला संगीताचं असं academic पद्धतीचं शिक्षण घ्यायचं नव्हतं.म्हणून मी मला आवडणार्या तत्वज्ञान या विषयांत  पदव्यूत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.जाधवपूर विद्यापीठातील तत्वज्ञानाची फँकल्टी आशियातील सर्वोत्तम फँकल्टी समजली जाते.जेव्हा माझ्या तत्त्वज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणामुळे संगीताकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही ,असं बाबांना आश्वस्त केल्यावर त्यांनी परवानगी दिली . मला स्वतःला भारतीय संगीत आणि तत्वज्ञान हे एकमेकांशी खूप संलग्न असल्याचं जाणवतं ,म्हणून तत्वज्ञान शिकणं ही माझ्यासाठी सहज आणि स्वाभाविक प्रक्रिया होती म्हणून तशी ती मला  माझ्या संगीताच्या प्रवासांतही प्रतिबिंबित होताना दिसतं .मी जो काही तत्वज्ञानाचा अभ्यास केला ,जे काही शिकले त्यातून जी विचारसरणी विकसित झाली त्यातून मला माणसं ,जगणं आणि मुख्य म्हणजे माझं संगीत अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करता येतं ,ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून ही घेता येतं . संगीत आणि तत्वज्ञान या दोन गोष्टी माझ्यासाठी सहज एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत ,जाणीवपूर्वक नाही.या दोन्ही गोष्टी मला माझी स्वतःची ओळख होण्यासाठी ,आत्मशोध घेण्यासाठी मदतीच्याच ठरत आहेत आणि तो तसा ही संगीत आणि फिलॉसॉफी यांचा  एकमेकांसोबतचा सहज प्रवास आहे ,ओढून ताणून एकमेकांशी  जोडलेला नाही .  
                      संगीताचं माझं शिक्षण तर अव्याहतपणे सुरुच आहे , माझी आईच माझी पहिली गुरु .  तिनेच मला पहिल्यांदा  संगीताच्या सुंदर जगात आणलं . मा ने मला माझ्या आतलं संगीत एवढ्या लहान वयात शोधण्यासाठी मदत केली . आता आपण बघतो जगण्याच्या वेगात लहान मुलातले असे सुप्त गुण शोधण्यासाठी पालकांकडे असा वेळचं नाहीये . या पार्श्वभूमीवर मला माझ्या आईविषयी जास्तच आदर वाटतो की ,तिने तो वेळ मला दिला . मला त्याचं  खूप मोल वाटतं .  मला माझ्यातलं संगीत शोधण्यासाठी तिने मदत केली म्हणूनच संगीत फक्त माझ्यासाठी छंदाचाच एक भाग न राहता तो  माझ्या जगण्याचा भागंच नव्हे तर संगीत  माझ्या अभिव्यक्तिचं एक सुंदर माध्यम ही झालं .   अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास आपण गुरूंसोबत करतो अशी माझी ठाम धारणा आहे . म्हणून माझ्यावर या सर्वांचं मोठं ऋण आहे . मी संगीताचं शिक्षण वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या गुरूंकडे घेतलं आणि ते शिक्षण थांबलेलं नाही अजून सुरूच आहे .माझे  बाबा माझ्यासाठी संगीताचा वेगळा प्रकाश आहेत ,कदाचित त्यामुळेच मी वेगवेगळ्या गुरूंकडे संगीताचं शिक्षण घेऊ शकले कारण बाबांनी शिक्षण घेण्याचा मार्ग माझ्यासाठी खुला केला होता . त्यांनी मी कधी ,कुठे आणि कसं शिकायचं हा प्रत्यक्ष शिकण्यापूर्वीचा  महत्वाचा भाग मला  शिकवला . शिक्षक आणि गुरु यांतही मला वाटतं हाच महत्वाचा फरक आहे. शिक्षक आपल्याला एखादा विषय शिकवतो आणि गुरु त्याचे अनुभव,मोठेपण आणि ज्ञानातून मिळणाऱ्या आत्मशोधाचा अनुभव शेअर करतो . मी संगीताचं उत्तम ज्ञान घेणारी कशी होईल या कडे बाबांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं . आपल्याला  जगण्याचा  प्रत्येक क्षण ज्ञानाचं मोठं भांडार खुलं करून देतो ,त्यातलं नेमकं चांगलं कसं आणि कधी निवडायचं ,चांगलं आणि वाईट यातील निवडीचा निर्णय  ही बौद्धिकदृष्ट्या न घेता आध्यत्मिक अर्थाने कसा घ्यायचा हे सगळं बाबांमुळे मला शिकता आलं .चांगलं किंवा वाईट हे vibes ने ठरवायचं ,चांगल्या गोष्टींना प्रतिसाद कसा द्यायचा ,चांगल्या गोष्टींशी कनेक्ट कसं व्हायचं  किंवा चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत हे  बौद्धिक दृष्ट्या नाही तर  भावनिक दृष्ट्या ठरवायचं . त्याचा विचार करायचा हा सगळा विचार आचरणात आणण्यासाठीची स्ट्रेंग्थ मला बाबांमुळे मिळाली . त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गुरूंकडून संगीताचं ज्ञान घेऊ शकले .  मला गुरूंनी दिलेलं ज्ञान केवळ त्या त्या विषयापुरतं मर्यादित न राहता ,माणूस म्हणून आपण समृद्ध होण्यासाठी ते आवश्यक आहे असं मला वाटतं . कुणी मी गायलेल्या बंदिशींना दाद द्यावी  आणि ती मिळणारी दाद सतत मिळत राहावी अशी आस मनाला लागलेली असते आणि ती आसंच मग आपला कलेची नित्य नूतन शिखरे शोधण्याचा  ध्यास बनते . राशिद काकू, झाकीर जी ,शोभा गुर्टुजी ,परवीनजी,किशोरीजी,बरकत अली खां साहेब बडे अली खां साहेब ,आशाजी,लताजी आणि किशोर कुमार जी हेच नव्हे तर  आता ची श्रेया घोषाल  या सगळ्यांकडूनच आणि यांच्या गाण्यातून  मी काही ना काही रोज शिकत असते . या सगळ्यांचं ऐकत ऐकत मी शिकत नकळत मी शिकत असते ,ते शिकण्याचे क्षणंच मला  जगण्यातलं अंतिम सत्याचा साक्षात्कार देतात.  तेच क्षण शुद्ध संगीताचे चे असतात,तेच क्षण सच्च्या सुराचे आणि अच्च्छ्या सूराचे ही असतात.बाबांनी मला या सगळ्यांत नेमकं काय,कधी आणि केव्हा शिकायचं हेच नेमकं शिकवलं.असे सच्च्या सूरांच्या  अनेक क्षणांना मला बाबांमुळे भिड़ता येतं.त्यामुळे बाबांचं माझ्या मनांत सर्वार्थाने  वेगळं स्थान आहे आणि ते कायमच राहिल.बाबांशी माझं नातं अनेक पदरी आहे,ते एकाच वेळी माझे बाबा,गुरू आणि गुरू बंधू ही आहेत.अशा अनेक नात्याने मी बाबांशी बांधली गेले आहे.बाबा माझ्या आयुष्यांतील सर्वात मोठे टास्क मास्टर राहिले आहेत.मी त्यांना अनेकदा घाबरते,ते अनेकदा हिटलर किंवा यमराज पेक्षा ही भयंकर वाटतात मला.तानपूर्याच्या मागचे बाबा तर ओह गॉड!

    मला बाबांचेच कर्नाटक संगीतातील गुरू बाल मुरली कृष्णनजी यांच्या कडे ही काही दिवस शिकण्याची अतिशय मौलिक संधी मिळाली.तो अनुभवंच एकूण विलक्षण होता.कर्नाटक संगीताचा प्रवास हिंदुस्थानी संगीता पेक्षा ही वेगळ्या वाटेचा आहे .त्यांत खूप सारं संगीत तर आहेच,सोबत गणित ही आहे.एकाच वेळी राग,तालाच्या अंगाने त्याचा प्रवास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रवाहाशी समांतर ही जातो आणि तंत्रशुद्धतेच्या अंगाने वेगळा ही होतो.त्यातली शिस्त आणि मौलिकता मला बाल मुरलीजींमुळे शिकता आली.बाल मुरलीजी आणि पं.ज्ञानप्रकाशजी या दोघांचीही  वैचारिक जडणघडण समजून घ्यायला ती दोघे बाबांचेही गुरू असल्यामुळे मदत झाली.
     पण हे सगळं संगीतामुळे आणि संगीतासाठीच असतं याची खोल जाणीव माझ्या मनांत आहे आणि म्हणून बाबा माझे सर्वांत मोठे प्रेरणास्त्रोत आहेत.त्यांच्यासाठी संगीता पेक्षा काहीही महत्वाचं नाही आणि माझ्यासाठी तसंच असावं त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असतात.
          कोलकात्यात  माझा जन्म झाला आणि तिथेच माझी सुरुवातीची सांगितिक जडण घडण झाली. या शहरांत  संगीताची मोठी परंपरा आहे.तिथल्या मातीत आणि श्वासांतही संगीत दरवळतं आहे.कोलकत्याचा संगीत प्रवाह छोट्या गल्लीबोळापासून,मोहल्ल्यांपासून ते  डोव्हर लेन फ़ेस्टीवल (कोलकत्त्यांतील महत्वाचा संगीत महोत्सव )पर्यंत पसरलेला
आहे.मला अभिमान आहे की,अशा संगीत भारलेल्या कोलकत्ता शहरांत मी वाढले.मैहर-सेनिया घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाउद्दीन खॉं साहेबांचं वास्तव्य ही बराच काळ कोलकत्याला होतं.पण मूळचे ते बांगला देश मधील गौरीपूर गावचे. आमचे पूर्वज ही बांगला देशमधूनंच कोलकात्याला स्थलांतरीत झालेले.बांगला देश मध्ये असताना माझे आजोबा बाबा अल्लाउद्दीन यांच्या शेजारच्या गावीच वास्तव्यास होते. ते तिथून गौरीपूर ला बाबांच्या गावी,त्यांचं वादन ऐकायला जात.बाबांचेच सुपुत्र उस्ताद अली अकबर खॉं यांनी ही Ali Akbar music school हे पहिल्यांदा १९५६ मध्ये कोलकत्यालाच सुरू केलं.नंतर स्वतः ते सँनफ्रान्सीस्को ला शिफ्ट  झाले  .संगीतकार आर.डी.बर्मन ही त्याच school चे विद्यार्थी .पंडित ज्ञानप्रकाशजी ही त्याच संगीत विद्यालयाशी काही काळ संबंधित होते.
      कोलकत्त्याचा  तो काळ अभिजात संगीताचा सुवर्ण काळ होता ,त्या काळातलं कोलकत्ता संगीतात् पूर्ण न्हालेलं होतं. त्या काळच्या अनेक गोष्टी मी ऐकते.तेव्हाचा अविभाजीत भारत संगीताच्या दृष्टीने कोलकत्त्यात एकवटला होता.त्या काळी ट्राम्स असायच्या,आज ही आहेत.ट्राम स्टेशन वर लोकं वर्तमानपत्रे अंथरून त्यावर बसून बड़े ग़ुलाम अली खॉं साहेबांच लाऊड स्पीकर वर सकाळी चार-पाच पर्यंत गाणं ऐकायचे.तिथला एक किस्सा मला बड्या बुजुर्गांकडून ऐकल्याचा आठवतोय  . कोलकत्यापासून तीस चाळीस कि.मी.वर उत्तरपाडा  जिथे आता माझे सासू सासरे राहतात. तिथे उत्तरपाडा  चक्र नावाचा एक जुन्या संगीत विषयक काम करणाऱ्या संस्थेचा वार्षिक संगीत महोत्सव भरायचा,त्या पटांगणाच्या बाहेरच एक दुकान होतं,तिथे चहा आणि भजी मिळायचे.एकदा वार्षिक महोत्सवाच्या वेळी  सकाळी चार वाजता बड़े ग़ुलाम अली खॉंसाहेब यांचा परफ़ॉर्मन्स होता.पण ते वेळेच्या आधीच तिथे पोचले आणि त्यांच्या आधी परफॉर्म करणारा कलावंताला त्याचं गाणं संपवायला अधिक वेळ लागणार होता म्हणून खां साहेब  बाहेरंच चहा घेत बसले.आतलं संगीत ऐकून खॉं साहेब प्रेरित झाले आणि तिथेच ते एका क्षणाचाही विलंब न लावता गायला लागले. त्यांचं  ते बहारदार गाणं ऐकून बाहेरचीच नव्हे तर अर्ध्या तासाच्या आत ऑडिटोरियम मध्ये असलेला रसिक मोठ्या संख्येने बाहेर आला आणि  तो चहावाला हे बघून विस्मयचकित झाला . हा किस्सा  सांगणारे अनेक जण आज वयाची सत्तरी पार केलेली आहेत . . अशा पद्धतीचं संगीताने भारलेलं वातावरण कोलकत्त्याचं होतं आणि असं  फक्त मोठ्या स्वरूपाच्या मैफलींच्याच बाबतीत नाही तर छोट्या बैठकीच्या बाबतीतही होत होतं.अतिशय सुजाण ,संगीताची जाण आणि समज असणारा,दाद देणारा  रसिक कोलकात्यात आहे . पण आता काळानुसार आणि वेगाच्या वेडांत यांत आता खूप बदल होतोय. शास्त्रीय संगीताचं प्रभाव ही थोडा फार ओसरतोय असं वाटतं.त्यापेक्षा  बदलत्या काळांत महाराष्ट्राचं याबाबतचं चित्र अधिक आश्वासक आहे आणि त्याच्याशी मी वीस वर्षाहून अधिक काळ जोडल्या गेली आहे.महाराष्ट्रातील सध्याचं संगीताचं वातावरण अधिक आश्वासक आहे . महाराष्ट्रातील या संगीत परंपरेला मी गेली वीस वर्षे अधिक जवळून पहाते आहे ,अनुभवते आहे . माझे गुरू उल्हास कशाळकरजी,श्रुति सडोलीकरजी किंवा पंडित वसंतराव देशपांडे जी ही सगळी महाराष्ट्रीयन आहेत,इतकंच नव्हे तर मी या काही वर्षांमध्ये पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी इतकंच नव्हे तर अगदी मिरजेपर्यंत गावांगावांत मी गायलेय,मुंबई सोबतंच महाराष्ट्रांतील अनेक शहरांत हेच संगीताच्या बाबतीत भारलेलं वातावरण आहे तसेच महाराष्ट्रांतील रसिक संगीताचा खूप जाणकार आहे असं वाटतं.एकदा मी  नाशिकला गणपतीच्या काळात एका रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या चौकात आयोजित केलेल्या मैफलीत गायले . चौकातच खुर्च्या आणि पेंडॉल टाकून मैफलीची व्यवस्था करण्यात आली होती ,दुसरे दिवशी एका परिचितांच्या घरी सकाळचा नाश्ता करून  त्या चौकातून कार ने बाहेर पडताना, माझ्या लक्षात आलं की हा तोच चौक आहे आणि इथेच  खुर्च्या टाकून आधीच्या रात्री करण्यात आलेल्या गाण्याच्या  कार्यक्रमात आपण  गायलोय  . हे असं सगळं संगीताने भारलेलं वातावरण मला अभिजात संगीताच्या दृष्टीने प्रेरणादायी वाटतं .  महाराष्ट्रात सगळीकडेच विशेषतः पुण्यात गायला मला खूप आवडतं.तिथे संगीताचं सुंदर वातावरण आहे . पुण्यात एकदा दिवाळी पहाट च्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ,छोट्या -मोठ्या चाळीस मैफली सुरु होत्या आणि सगळ्या हाउसफ़ुल .मी नेहमी आणि कायमंच म्हणत आलेय की,महाराष्ट्रांत संगीताचं फ़ार चांगलं वातावरण आहे.मला महाराष्ट्रीयन लोकांनी खूपंच प्रेमाने स्वीकारलं .म्हणून मी स्वत:ला बंगाल इतकंच महाराष्ट्राचीही समजते.नॉन महाराष्ट्रीयन गायकांना खुल्या दिलाने स्वीकारण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे.
               शास्त्रीय संगीतासोबतंच मी लाईट म्युझीक ही गातेय.ए.आर.रहमानजींसोबत मी वीस वर्षांची असताना बाबांसोबत दीपा मेहतांच्या फ़िल्म “ वॉटर” साठी वैष्णव जनतो गायलेय.तो खूप सुंदर अनुभव होता.नंतर ऋतुपर्णो घोष यांच्याही फ़िल्म साठी ही गायलेय.मध्ये मी कोक स्टुडिओ साठी मी शांतनू मोईत्रा साठी गायलेय ,एवढंच नव्हे तर,शंकर एहसान लॉय यांनी कंपोज़ केलेल्या मिर्झीया या चित्रपटासाठी गायलेय.हा प्रवासंही सुरू आहेच.रवींद्र संगीत आमच्या बंगाल्यांच्या नसानसांत भिनलेलं आहे.माझ्या आईसाठी गुरूदेव रविंद्रनाथांची “गीतोबीतान “ गीता किंवा बायबल सारखंच आहे.तीच भावना प्रत्येक बंगाली माणसांची रविंद्र संगीताबाबत असेल.म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही असणारा बंगाली रवींद्र संगीत गुणगुणतोच.
       संगीत माझ्या बायलॉजिकल लिगसी आहे पण ते कंपल्सरी नसावं असं आता मला वाटतं.
     आमच्या घराण्यात संगीत आहे ,म्हणून ही गाणं माझ्यापर्यंत  झिरपत झिरपत आलं . पण हाच घराण्याचा गाण्याचा धागा माझ्या धाकट्या  भावाला प्रत्यक्ष गाण्याकडे वळवू शकला नाही . तो संगीताशी वेगळ्या पद्धतीने जोडला गेला आहे . तो वृत्तीने संगीतकार आहे  तसंच साऊंड इंजिनीरिंग /साऊंड स्केपिंग चं तांत्रिक शिक्षण त्याने घेतलं आहे आणि त्या क्षेत्रात तो त्याचं काम करतोय . त्यामुळे घराण्याच्या वारशासोबतच  स्वतःचा उपजत कल ओळखणं ही महत्वाचं  आहे ,असं मला वाटतं . माझा मुलगा रिशीथ जेमतेम सहा -सात वर्षांचा आहे ,पण त्याला  गाण्यापेक्षा तबला वाजवण्यात सध्या तरी जास्त रस दिसतोय.  पुढे हाच कल असेल किंवा अजून काही बदल होतील ते सांगणं कठीण आहे .परंतु  त्याने आयुष्य समृद्ध करण्यासाठी  संगीत आत्मसात करावं असा माझा मनापासून प्रयत्न असेल .बाकी त्याच्या निर्णयाचं मी स्वागत आणि आदर करेल .
       बाबा श्रुतीनंदन या संगीतासाठी वाहिलेल्या संस्थेच्या माध्यमातून हजार पेक्षा ही जास्त विद्यार्थ्यांना संगीत शिकवत आहेत . श्रुतीनंदन च्या माध्यमातून बाबा वेब द्वारे ही संगीताचं शिक्षण देतात .  निसर्गात अस्तित्वात असलेल्या संगीताचं आकलन आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी बाबानी श्रुतीनंदन ची स्थापना केली . त्यांचे ऑनलाइन पद्धतीने ही संगीत शिकणारे हजार पेक्षा ही जास्त विद्यार्थी जगभर विखुरलेले आहेत . मी काही वर्षं श्रुतीनंदन च्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला पण सध्या तरी मला ते शक्य होईल असे वाटत नाही . त्यासाठी एक प्रकारची शिस्त ही लागते आणि स्वतःच्या ज्ञानाची पुनरावृत्ती करण्याची पुन्हा पुन्हा तयारी ही आवश्यक असते . तिथे काही नियम तुम्हाला पाळायला लागतात.विद्यार्थ्यांच्या कलेनं ते घेताना तुमच्यात त्यांना हवे तसे बदल ही करायला लागतात.मा आणि बाबा यांनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं आहे परंतु त्यासाठीची मनोभूमिका अजून माझी स्पष्ट नाही . ती स्पष्ट झाल्यावरच मी कदाचित शिकवण्याचा विचार करू शकेल ,सध्या मीच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आहे आणि ती शिकण्याची प्रोसेस मी समरसून एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतेय . संगीत हे माझ्यासाठी कुठेतरी जाणं ,काहीतरी मिळवण्याचं साध्य नसून ,स्वतःचा पुन्हा पुन्हा आत्मशोध घेण्याचं साधन आहे . जसा एखादा चित्रकार ,त्याच्या चित्राच्या माध्यमातून स्वतःचा शोध पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतो ,तेच मी संगीताच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते .हा प्रवास माझा एकटीचा,स्वत:ला समृद्ध करत जाणारा प्रवास आहे तसेच संगीताच्या असीम विश्वात ,स्वतःचा सांगितीक कोपरा शोधण्याचा हा प्रवास आहे .
                               बाबा माझे वडील आहेत ,पण गुरु त्याहून अधिक आहेत . गेली पंच वीस वर्षाहून जास्त काळ मी सतत गातेय . बाबांची दाद तर सोडाच ,पण  मी बरी गायलेय असं ही ते अजून म्हणालेले नाहीत . म्हणजे त्यांना अपेक्षित असणारं परफेक्शन अजून माझ्या गाण्यात नाही असं त्यांना वाटतं . कुठल्याही मैफलीत ते समोर असल्यावर त्यांना माझ्या गाण्याबद्दल विचारलं तर ते सरळ म्हणतात ,तुझा मूड का ठीक नव्हता ,गाण्यावर तुझं लक्ष केंद्रित का होत नव्हतं ,तू स्टेजवर टाइम पास का करत होतीस . एक ना अनेक त्यांच्या माझ्या गाण्याबाबत  तक्रारी असतात . माझं गाणं परिपूर्ण असावं असा त्यांचा ध्यास असतो . त्यामुळे मला अजूनही प्रतीक्षा आहे ,त्यांनी माझ्या गाण्याला दाद देणं तर दूर  फक्त  मी बरं गायलेय असं त्यांनी कधीतरी म्हणावं .                     
मी वाट बघतेय बाबांच्या  या प्रतिक्रियेची .


                                                     

रानझरा ओळखीचा ,तहानेची बोली

रानझरा ओळखीचा ,तहानेची बोली
गालिब आणि ग्रेस
रुणझुणतच कविता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येते ,तशीच माझ्याही आयुष्यात आली ,कवितेच्या त्या आगमनाचे ते थरथरते पडसाद अजून ही जाणवतात . कधी ती झिमझिमत मनात बरसत राहिली, तर कधी तिने भावनेच्या खोल तळाशी पोचवून मला अंतर्मुख केले ,त्या भावगर्भी शब्दांशी जुळलेल्या मनाचे धागे मला स्वतःला स्वतःशी जोडण्यात मदतीचे ठरतात . मला स्वतःला मनात टिपकागदासारखी शब्दांना अर्थासह शोषून घेणारी ,वेळोवेळी त्यातून अर्थाचे विविधरंगी भावविश्व उलगडणारी मनस्विनी कविता भावते . तिच्याशीच माझं आत्मीय नातं निर्माण होतं .
कवितेच्या या प्रांतात शिरल्यावर माझ्या आयुष्यात दोन माणसं आली ,एक होता गालिब आणि दुसरा ग्रेस . ग्रेस ना गालिब त्यांचे सहोदर वाटायचे . गालिब चं ग्रेस बद्दलच काय मत होतं ,हे कळणं कधी शक्य नाही .
हे सगळं मनात येत राहतं एकाच वेळी ,मला गालिब ,ग्रेस एकामागोमाग आठवतात . त्यांच्या कविता ,शायरी ही एकामागोमाग व्याकूळ करते . मी ही मनातल्या मनात त्यांचे माझ्याशी जुळलेल्या भावबंधाची मनातल्या मनात उजळणी करून घेते .
गुलजार ने दिग्दर्शित केलेल्या गालिबच संगीत दिलं होतं जगजीत सिंगांनी ,त्यामुळे नसीर ,गुलजार, जगजीत ,गालिब अशी सूत्रबद्ध ओळख माझ्या मनात ठसली होती ,त्यानंतर बेगम अख्तर पासून ते आबिदा पर्यंत सगळ्यांनी गायलेला गालिब ऐकला ,पण मनात जगजीत च्या आवाजातलाच गालिब उतरला . चित्रा चा आवाज एरवी मला खूप भावतो असे नाही ,पण गालिब तिने प्राणातून गायला आहे ,रोयेंगे हम हजार बार ,कोई हमे सताये क्यो ?असं ऐकताक्षणी सगळ्या आयुष्यातलं दुखं डोळ्यातून कोसळेल की काय असं वाटतं . गालिब च्या कॅसेट पासून itunes मधून load केलेल्या गझला पर्यंत सगळ्या इलेक्ट्रोनिक माध्यमातून गालिब ने माझ्याकडे वास्तव्य केले आहे ,तच पुस्तकाबाबत गालिब च्या शायरीच्या पुस्तकापासून ते गुलजार च्या हिंदी -इंग्लिश स्क्रिप्ट पर्यंत . तरी कुणी मागितले तरी त्यापैकी काही द्यायला मन धजावत नाही .
हम ने माना कि तग़ाफुल न करोगे लेकिन
ख़ाक हो जाएँगे हम तुमको ख़बर होने तक।
तेच ग्रेस च्या साजणवेळा बद्दल ही मला वाटतं ,साजणवेळा कार्यक्रमाची कॅसेट मी पुण्याच्या अलूरकर मधून मिळवली होती ,त्याची किती पारायणं झाली ,ते आठवत नाही .माधुरी पुरंदरे चा स्वर तर काळजात रुतला आहे . पण आता पुन्हा cd ,mp ३ मधून ऐकताना त्यातलं कळण्या इतक जगणं ,नाती आपल्याला शिकवतंय असा भास होतो . कालपासून साजणवेळा आणि गालिब आलटून पालटून ऐकतेय ,पुन्हा पुन्हा काहीतरी रुतत जातंय ,काहीतरी सलतंय ,शहर ,माणसं की गालिब ,ग्रेस च्या भावनेचा डोह कुठे डुंबवतोय ते कळत नाही .
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा .

चित्रपटांचा उत्सव जागुन ….

चित्रपटांचा उत्सव जागुन …. 
प्रतिमा ,साउंड ,अंधार आणि त्याभोवती मनाचं एकाग्र असणं साधणाऱ्या चित्रपटाशी नातं जुळून किती तरी काळ झाला , बालपणीच्या माझ्या सगळ्या आठवणी चित्रपटा भोवती आणि चित्रपटापासूनच सुरु होणाऱ्या आहेत . इमेजेस ,साउंड आणि एक्शन्स स्वरूपाच्या .सत्यजित रे यांची पथेर पांचाली आणि गोविंद निहलानी यांचा अर्धसत्य या दोन चित्रपटांमुळे माझ्या जगण्यात चित्रपट नावाचा ऋतू कायमचा वसतीला आला . मग त्या संदर्भातील पुस्तकं , सीडी ,डीव्हीडी ,हार्ड डिस्क यांनी घर भरंतच आहे . स्वतःच्या अशा तिन्ही चार घरांमध्ये कुठलं interior करायचं याचं नियोजन यांच्या जागेपासून होते . चित्रपटांचा उत्सव मात्र माझ्या आयुष्यात माझे सासरे श्री . सुधीर नांदगावकर यांच्यामुळे अवतरला किंबहुना चित्रपटा साठीच मी तुझ्याशी लग्न केलं हे ही मी सतीश ला ऐकवत असते अधून मधून . मी माझं उनाड ,माझ्याशिवाय कुणाचीही बांधिलकी न मानणारं जगणं सोडून माझ्या सासरच्या घरी रमले याचं ही बऱ्यापैकी श्रेय चित्रपटाच्या आमच्या घरातील संस्कृतीलाच द्यायला हवंय . सरांनीच ( सासरे बुवांना मी सर म्हणते ,अजूनही )मला थर्ड आय ,मामि ,इफ्फी ला जायची आणि नियमित चित्रपट बघण्याची सवय लावली .
मी औरंगाबाद ला आम्ही असताना दृष्टांत नावाची फिल्म सोसायटी ही चालवली होती . त्याची खूप मजा ही आली होती . Truffaut ,सत्यजित रे ,फेलिनी ,डी सिका ,बर्गमन ही आम्हाला घरचीच मंडळी वाटतात ,इतके आम्ही त्यांच्यावर सतत बोलत असतो . आमच्या घरांत चित्रपटांबाबतच्या ठराविक भूमिका आहेत ,त्यामुळे तद्दन व्यावसायिक चित्रपट बघायचे असतील तर मला सध्या फक्त माझ्या साडे पाच वर्षाच्या मुलाचीच कंपनी असते ,सतीश बायकोच्या प्रेमानेही अशा चित्रपटांना येत नाही .  . पण आता खरं सांगायचं तर माझ्यात सुद्धा खानावळी चे चित्रपट स्क्रीन वर जाऊन बघण्याचे पेशन्स राहिले नाहीत . हे सगळं आठवतंय सध्या सुरु असलेल्या चौदाव्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल च्या निमित्ताने . सुदैवाने तो अकादमीतच असल्यामुळे शांतपणे ,धावपळ न करता जमेल तसा अनुभवता येतोय.
मला सर्वात आवड्ल्यांपैकी आहेत Tajrish (Iran ),अस्तु (मराठी )
,Pagadi (hariyanavi ),Ants story (Bangaladesh ),The Threshhold (choukah ) bengali ,set me free (south korea ).
अनन्या:सरत्या वर्षातलं सर्वोत्तम नाटक
2017 मधील शेवटच्या दिवशी गडकरीला अनन्या या नाटकाचा प्रयोग बघता आला.जाहीरातीत गोंधळ होऊनही गडकरीचा प्रयोग हाऊसफुल्ल होता.अनन्या हे नाटक त्याच्या पहिल्या फ्रेम पासून खिळवून ठेवतं.नेपथ्य,प्रकाश योजना आणि संगीत ए क्लास आहे.बासरी या संगीत वाद्याचा नाटकांत अप्रतिम वापर केलाय.ब्लँक आउट चा वापर जुन्या चित्रपटांतील प्रसंगांसारखा केला आहे.त्यामुळे तीन चार बँकड्राँप कँरेक्टर्स सारखे भासतात.
आता नेमकेपणाने कथेवर बोलायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या कथेचा नाटकाच्या फाँर्म साठी विचार करणं हेच धाडस म्हणायलं हवं आणि हे धाडस सुयोग ने समर्थपणे पेललं आहे.नाटक ही फक्त अनन्याचीच गोष्ट नाही तर तिच्या बाबांची आणि भावाची गोष्ट त्यांत अल्लाद मिसळलेल्या आहेत आणि तरी ही ती अनन्याचीच ,तिच्या जिद्दीचीच गोष्ट आहे.अभिनयाबाबत बोलायचं तर सगळ्यांनीच त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.तरी ही विशेष उल्लेख करावा लागेल तो रूतुजा बागवे आणि प्रमोद पवार सरांचा.रूतूजा बागवे ला एवढ्या कमी वयांत अशी आँथर बँक भूमिका करायला मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं आहे.तिने या भूमिकेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत जाणवते.त्यामुळे तिच्या प्रत्येक सीन्स ला टाळ्यांचा कडकडाट होतो.she deserves it.
मला ते बघताना मधुगंधा कुलकर्णी च्या लाली लिला या नाटकाची आठवण झाली.
प्रमोद पवार सरांचा बाबाचा रोल वेगळाच आहे.त्यांत त्यांच्या भूतकाळाची सावली आहे,दोन मुलांच्या दोन हतबलता आहेत.तो वास्तववादी आहे.अनन्याच्या आयुष्यांत आलेल्या संकटाने तो सामान्य माणसासारखा बावरतो,गाँड बनण्याचा प्रयत्न करत नाही.सरांच्या कारकिर्दीतील ही महत्वाची भूमिका ऩक्कीच आहे.अनन्याच्या अपघातानंतरच्या प्रसंगात तर त्यांनी कमाल केली आहे.कमी संवाद पण फक्त देहबोलीतून तो प्रसंग पेलवला आहे.एकाच वेळी मुलीविषयीचं प्रेम,काळजी आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य नसणं हे सगळं त्यातून आलंय.Hats of.त्यांच्यातला उत्तम अभिनेता पुन्हा पुन्हा प्रसंगात जीव टाकतो.
अनन्या ,पुन्हा एकदा नवरा आणि मुलासोबत बघायचं आहेच.या नाटकाच्या निमित्ताने प्रताप फड य़ा नाटककाराचे आणि दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत.वेगळा आणि धाडसी प्रयोग केल्याबद्दल.
Thanks Pramod Pawar sir!
Must watch.

Like · ·
गंधर्व गान आणि गोदावरी 

मुकुल शिवपुत्र चा कार्यक्रम ऐकताना गंगाखेड च्या गोदावरीची आठवण आली.मुकुल चं गाणं ऐकताना मला न चुकता नद्यांची आठवण येते ,त्याचा ही खळाळता स्वरांचा झरा मधूनच कोरडा ,रखरखीत होऊन जातो . नदीचं  तेच पाहताना आणि मुकुलच्या आवाजातून ती आटत जाणारी वेदना साहताना तितकाच त्रास होतो . मग मी त्याची"" बमना " ही ठुमरी आणि गोदावरीची पुरातली नरशा बुडाल्याचे दृश्य नजरे समोर आणण्याचा प्रयत्न करते .
दिवस असेच वेगाने पुढे धावत आहेत.सगळच मागे पडेल की  काय याची भीती वाटते.
लिहिण्याचा प्रोफ़ेशनल  सराव नसल्यामुळे हे लिहितानाही अडकल्यासारखे होते.
मागे एलकुंचवारांनी न गंगा सदृश तीर्थम ची   मौनरागातून नदीची सैर घडवून आणली होती.
गंगाखेड ला असताना कुणी ही माझी  महत्वाची व्यक्ती आली की  तिला नदीवर घेऊन जायची  प्रथाच मी पाडली  होती....
नंतर गंगाखेड सुटले,नदीचे पाणी आटले,आता पावसाळा सरला की कोरड्या नदीचे मोठे विस्तीर्ण पात्र भकास्सारखे पुढ्यात दिसते.मागच्या ट्रीप मधील  कॉर्बेट नदीचे असेच भर उन्हाळ्यातले रखरखीत कोरडे पात्र बघितले की  तीच जुनी गोदावरी ची गच्चं आठवण दाटून आली.गोदावरीच्या आठवणीसाठी ही निमित्ते लागतात,तिची स्वयम्भू अशी आठवण मनात उगवतच नाही.,हा गोदावरीचा दोष की आठवणींचा हे  कळत नाही.

 

Tuesday, December 30, 2014

शेक्सपिअरवाला शशी

                                      शेक्सपिअरवाला शशी

शशी कपूर यांचं नुकतंच निधन झालंय आणि त्या निमित्ताने त्यांचं नाट्यकला आणि चित्रपट क्षेत्रांतील योगदान पुन्हा नव्याने आठवतंय . शशी कपूर केवळ नाट्य -सिने अभिनेतेच नव्हते ,तर ते निर्माता ,दिग्दर्शक आणि पृथ्वी थिएटर चे प्रणेता असे  बहुआयामी क्रिएटर होते . त्यांच्या नाट्य -चित्रपट क्षेत्रांतील योगदानाचे विविध पैलू बघत असताना आवर्जून लक्षात येतं ते चित्रपटांतील  क्रॉसओव्हर  पातळीवरचं प्रामुख्याने नोंदवता येईल असं काम आणि त्यांनी तिथे केलेलं भारतीयांचं प्रतिनिधित्व.त्यांत कुठे ही देशभक्तीचं बिरुद नव्हतं तर होत्या आपल्या रोजच्या जगण्यातल्या ,पाहण्यातल्या व्यक्तिरेखा .त्यांनी क्रॉस ओव्हर चित्रपटातून ही  साकारलेल्या व्यक्तिरेखा सर्वसामान्य रोजच्या जगण्यातून उगवलेल्या असल्या तरी  शशी कपूर हे खऱ्या अर्थाने भारतातील पहिले क्रॉसओव्हर  स्टार होते असंच म्हणावं लागेल . त्यांनी त्यांच्या एकूण चित्रपट कारकिर्दीतील अनेक वर्षं सातत्याने क्रॉस ओव्हर  चित्रपटांमध्ये काम केलं . त्यापैकी काही  चित्रपटांची निवड अनेक आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झाली होती .त्यांचं  क्रॉस ओव्हर चित्रपटातील योगदानाचा उल्लेख न करता आपल्याला पुढे जाताच येणार नाही .   त्यांच्या नंतरच  ओम पुरी,नसीरुद्दीन शाह ,शबाना आझमी इरफान खान ,तब्बू सारख्या अनेक भारतीय अभिनेत्यांना क्रॉसओव्हर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय क्षमतेला सिद्ध करण्याची संधी मिळाली . या पर्वाची  सुरुवात मात्र शशी कपूर यांनी नेटाने आणि सातत्य राखून  केली होती.
                     शशी कपूरना  अभिनयाचा समृद्ध वारसा वारसाहक्कानेच मिळाला असंच म्हणायला हवं . त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे भारतीय नाट्य-चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेते होते ,भाऊ राज आणि शम्मी यांनी ही चित्रपट क्षेत्रांत स्वतःच्या अभिनयाचा वेगळा ठसा निर्माण केला होता . अशा पार्श्वभूमीवर शशी कुठल्याही प्रभावाचं ओझं न बाळगता  तितक्याच आत्मविश्वासाने आणि अंगभूत असणारा जंटलनेस दाखवत चित्रपटसृष्टीत आले . राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील सुरुवातीच्या भूमिका सोडल्या तर इतर चित्रपटातील काम  त्यांनी स्वबळावर मिळवलं.अभिनयात पृथ्वीराज ,राज आणि शम्मी यांचा ऑलरेडी ब्रँड निर्माण झालेला असताना ही त्यांना कॉपी न करता  मूलभूत अंगिकारलेली नैसर्गिक अभिनयाची कास पकडून त्यांनी तसं  धाडस केलं .म्हणून त्यांच्या अभिनयाबाबत सुरुवातीला समिक्षकांचं खूप चांगलं मत नसलं तरी शशी कुणाची कॉपी करतात अशी टीका नक्की झाली नाही .  एकीकडे शशी तद्दन व्यावसायिक हिंदी चित्रपटांत भूमिका करत असताना दुसरीकडे आशयघन चित्रपटांमधून ही तेवढ्याच नेकीने काम  करत राहिले .त्यातूनच उत्तम  अभिनेता म्हणून ते घडत गेले . शशी लहान असल्यापासूनच पृथ्वीराजजींसोबत त्यांच्या नाटक कंपनीचा अविभाज्य भाग होते . पृथ्वी मधील नाटकांत अभिनयासोबतच ते वेळप्रसंगी  स्टेज आणि लायटिंग चं ही काम करायचे. पृथ्वीराज यांनी सुरु केलेली नाटक कंपनी सोबत शशी भारतातील विविध ठिकाणी हिंदी नाटकांचे प्रयोग करायचे  . तेच काम  भारतात  इंग्रजी नाटकांबाबत जेफ्री कँडल आणि त्यांची पत्नी लॉरा लीडेल यांचा “शेक्सपिअराना “ही नाटक कंपनी करायची . अनेकदा पृथ्वी आणि शेक्सपिअराना या दोन्ही ग्रुप ची नाटकं अनेक ठिकाणी एकामागोमाग व्हायचे . अशाच कलकत्याच्या एम्पायर थिएटर मधील नाट्यप्रयोगादरम्यान शशी आणि जेफ्री कँडल यांची मुलगी जेनिफर यांची भेट झाली . जेनिफर आणि तिची बहीण फेलिसिटी या दोघीही शेक्सपिअराना च्या नाटकांत भूमिका करायच्या . शशी आणि जेनिफर ही दोघं ही थिएटर च्या पॅशन मधून एकमेकांच्या जवळ आली. जेनिफर ने तोपर्यंत  हिंदी  नाटकांतच फक्त भूमिका करणाऱ्या शशी यांच्या इंग्रजी उच्चारणांवर विशेष मेहनत घेतली . त्याचा फायदा शशीना शेक्सपिअराना ग्रुप च्या नाटकांत आणि कालांतराने क्रॉसओव्हर   चित्रपटांत भूमिका करताना झाला .शशी यांच्या
नाट्य -चित्रपट क्षेत्रांतील वाटचालीत त्यांची पत्नी जेनिफर यांची कायमच महत्वाची भूमिका राहिली आहे . त्यांचं वैयक्तिक आयुष्य ही देशाच्या ,भाषेच्या मर्यादा ओलांडून फक्त नाट्य -चित्रपट कलेच्या दिशेने प्रवास करणारं खऱ्या अर्थाने क्रॉस ओव्हर  होतं  . त्या दोघांमधील  हीच कॉमन पॅशन त्यांच्या नात्यातील  पहाट, माध्यान्ह आणि संध्याकाळ  होती
                         
                                  शशी यांनी बालकलावंत म्हणून राज कपूर यांच्या काही चित्रपटांत भूमिका केल्या होत्या . त्यांची तरुण अभिनेता म्हणून “चार दिवारी “हा पहिला  चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर असतानाच  

त्यांनी मर्चंट -आयव्हरी प्रोडक्शन चा  देवगर हा चित्रपट साइन केला होता . तो अमेरिकन अँथ्रोपोलॉजिस्ट च्या आयुष्यावर आधारित होता .कंपनी मार्फत निर्माण होणाऱ्या पहिल्या इंग्रजी चित्रपट “देवगर “मधील नायकाच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी मर्चंट यांना  शशी यांचे नाव त्यांची ऍडव्हर्टायझिंग मधील ऑस्ट्रेलिअन मैत्रीण बेटी डेल गार्नो हिने सुचवले . त्यानुसार मर्चंट शशींना भेटले आणि पहिल्या भेटीतच त्यांना शशींच्या व्यक्तित्वाने मोहित केले. चित्रपटाची स्क्रिप्ट जेनिफर आणि शशी या दोघांनाही आवडलेली असल्यामुळे ते चित्रपट करण्यास तयार झाले . परंतु आर्थिक अडचणीमुळे तो चित्रपट बनू शकला नाही.  शशी कपूर यांनी अभिनित केलेल्या दहा पेक्षा अधिक क्रॉसओव्हर  चित्रपटांमध्ये सर्वांत जास्त चित्रपट शशीनी मर्चंट -आयव्हरी यांच्या सोबत केले आहेत . मर्चंट -आयव्हरी या अमेरिकेतील फिल्म कंपनीची स्थापना इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी या दोघांनी १९६१ ला केली होती . देवगर या चित्रपटाची निर्मिती होऊ न शकल्यामुळे मर्चंट यांनी रूथ प्रावर झाबवाला या दिल्ली स्थित जर्मन लेखिकेच्या “द हाऊसहोल्डर “या कादंबरीवर आधारित निर्मिती करत असलेल्या द हाऊस होल्डर याच  नावाच्या चित्रपटासाठी शशीचा विचार केला . परंतु सदर चित्रपटातील नायकाची भूमिका ही साध्या मध्यमवर्गीय शाळा शिक्षकाची होती आणि त्या भूमिकेसाठी रुबाबदार आणि देखण्या व्यक्तिमत्वाचा शशी योग्य नाही असे रूथ आणि दिग्दर्शक जेम्स आयव्हरी या दोघांचेही मत होते . हे शशींना कळताच ते स्वतः दिल्लीला गेले आणि तिथल्या प्रसिद्ध सलून मध्ये जाऊन सद्यस्थितीत असलेल्या स्टायलिश हेअर कट चा  नॉर्मल स्कुल टीचर सारखा हेअर कट करून ते दोघांनाही भेटले आणि स्कुल टीचर च्या साध्या  भाषेत रूथ आणि जेम्स या  दोघांशीही  बोलले . अशा तऱ्हेने दोघांची त्या भूमिकेसाठी  समंती मिळवून मुंबईत परतले आणि  द हाऊसहोल्डर या चित्रपटांत शशींचा प्रवेश निश्चित झाला.

  पुढे मर्चंट -आयव्हरी सोबत  शशींनी एकूण सात  चित्रपट केले . मर्चंट -आयव्हरी ,रूथ प्रावर झाबवाला आणि शशी कपूर यांनी लॉँग रन मध्ये अनेक  वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचे चित्रपट एकत्रितपणे   केले . त्यापैकी शेक्सपिअरवाला (१९६५) या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल . द हाऊसहोल्डर नंतर चा तो महत्वाचा चित्रपट होता . तो जेफ्री कँडल यांच्या शेक्सपिअराना या नाटक कंपनीच्या नाटक दौऱ्यावर  आधारित हा चित्रपट होता . त्यात शशींसोबत जेनिफर ची बहीण फेलिसिटी कँडल ,मधुर जाफरी आणि शशीचे सासरे जेफ्री कँडल यांनी महत्वाच्या भूमिका केल्या . त्यानंतरचा बॉम्बे टॉकीं (१९७०)  हा चित्रपट आला . तो मुंबईतील चित्रपट सृष्टीवर आधारित होता . यांत शशींनी पडद्यावर ही फिल्म स्टार चीच भूमिका केली . त्यांच्या सोबत या चित्रपटांत अपर्णा सेन ही होत्या आणि हिट अँड डस्ट (१९८३) हा  चित्रपट ही केला  .हिट अँड डस्ट रूथ हा रूथ च्या त्याच नावाच्या कादंबरींवर आधारित होता  . हिट अँड डस्ट मध्ये जुली क्रिस्टी आणि उस्ताद झाकीर हुसेन हे सहकलावंत होते . हिट अँड डस्ट या चित्रपटाने शशी कपूर यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये त्यावेळी सर्वत्र हिट अँड डस्ट चे पोस्टर्स झळकत होते . ते लोकप्रियतेचं प्रतीक मानल्या जायचं . हिट अँड डस्ट चित्रपटाने व्यावसायिक यश तर मिळवलेच ,सोबत त्याची कान आणि इतर महत्वाच्या फिल्म फेस्टिवल्समध्ये ही निवड झाली . शेक्सपिअरवाला आणि बॉम्बे टॉकी ची ही  पटकथा रूथ यांनी लिहिली होती . त्यानंतर रिलीज झालेला  द डिसिव्हर्स (१९८७) हा जॉन मास्टर्स या ब्रिटिश आर्मी ऑफिसर ने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता.  इन कस्टडी (१९९४)हा अनिता देसाई यांच्या कादंबरीवर आधारित  महत्वाचा चित्रपट शशींनी केला. त्यात त्यांनी वयस्क नूर नावाच्या उर्दू शायराची भूमिका केली होती इथे इस्माईल मर्चंट हे पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते  . सुरुवातीला इन कस्टडी मधील उर्दू अदबीने बोलणं आवश्यक असणाऱ्या नूर ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास शशींमध्ये नव्हता म्हणून ते नूर ची  भूमिका करण्यासाठी फार उत्सुक नव्हते परंतु खुद्द राज कपूर आणि शम्मी कपूर या दोघा भावांनी शशींना ही भूमिका  आव्हान म्हणून स्वीकारण्यासाठीचा आग्रह केला आणि शशींनी ती भूमिका स्वीकारली. नूर चा राग ,अस्वस्थता ,परिस्थिती बाबतची विवशता हे सगळं त्यांनी अभिनयातून आणि देहबोलीतून व्यक्त केलं होतं . म्हणूनच नूर ची भूमिका शशींच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय भूमिका ठरली.साईड स्ट्रीट्स (१९९६) हा शशी कपूर यांनी मर्चंट -आयव्हरी सोबत केलेला  शेवटचा चित्रपट होता .  मर्चंट -आयव्हरी  यांच्यासोबतचं शशी यांचं असोसिएशन भारतीय चित्रपट क्षेत्रांतील महत्वपूर्ण घटना होती  .शशी यांची पार्श्वभूमी ,जेफ्री कँडल यांचं मार्गदर्शन यामुळे शशी अभिनेता म्हणून अधिक प्रगल्भ आणि नैसर्गिक होते . ते कुठल्याही भूमिकेत आनंदाने सामावून जायचे . चित्रपटातील व्यक्तिरेखेत ते स्वतःचे अनुभव ,पूर्वग्रह ,उद्देश ,घटनेकडे बघण्याची भूमिका या सकट ते प्रवेश करायचे म्हणून त्यांचा अभिनय कधी ही मेलोड्रामा च्या जवळ गेला नाही . तो तितकाच अस्सल आणि नैसर्गिक राहिला.
                             मर्चंट -आयव्हरी या प्रोडक्शन कंपनी व्यतिरिक्त शशींनी अनेक  क्रॉसओव्हर चित्रपटांमध्ये काम केलं . त्यांत सिद्धार्थ (१९७२)हा हरमन हेसे यांच्या कादंबरीवर आधारित होता . न्यूयॉर्क स्थित कॉनराड रुक्स यांना या कादंबरीने खूप प्रभावित केलं होतं . स्वतःच्या आत्मशोधासाठी निघालेला सिद्धार्थ  आणि   त्याचा त्या वाटेवरचा  प्रवास अशी चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना होती .शशींची सिद्धार्थ च्या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड झाली आणि त्यातल्या कमला च्या भूमिकेसाठी सिमी गरेवाल याना निवडलं . सिद्धार्थ रिलीज झाल्यावर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला . सॅमी अँड रोझी गेट लेड (१९८७) हा स्टीफन फ्रिअर्स या इंग्लिश दिग्दर्शकांचा चित्रपट शशींनी केला . तो फार चर्चेत आला नाही . जोनाथन स्विफ्ट च्या गॅलिव्हर ट्रॅव्हल्स या कादंबरीवर आधारित चित्रपटाची टीव्ही मिनिस्ट्रीज  ने निर्मिती केली ,त्यांत शशी यांची भूमिका होती . त्यानंतर जमील देहलवी या पाकिस्तानी दिग्दर्शकाच्या “जिना “या चित्रपटांत शशींनी narator ची भूमिका केली होती .या चित्रपटाला पाकिस्तानात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता . त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशींनी चित्रपटांत काम करणं बंद केलं . त्याला ही वीस वर्षाहून अधिक काळ झाला .

                प्रसिद्ध सतार वादक पंडित रविशंकर आणि शशी कपूर यांच्या क्रॉसओव्हर कला प्रवासांत एक विलक्षण साम्य जाणवतं . शशी कपूर यांनी जेव्हा मर्चंट -आयव्हरी ,रूथ प्रावर झाबवाला यांच्या समन्वयाने क्रॉस ओव्हर चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्याच काळात पंडित रविशंकर हे ही यहुदी मेन्युहिन आणि जॉर्ज हॅरिसन या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत भारतीय संगीताचे अनोखे प्रयोग करत होते . पंडितजींनी भारतीय संगीताचे मूळ सौन्दर्य न हरवता पाश्चात्य वाद्यांसोबत फ्युजन चे प्रयोग केले आणि भारतीय संगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले .तीच भूमिका चित्रपटांच्या बाबतीत शशी कपूर यांनी पार पाडली आणि दोघांनीही हे क्रॉस ओव्हर कलेचं दालन भारतीय कलावंतांसाठी उघडून दिले . हे त्यांचं मोठं श्रेयंच मानावं लागेल .